Thursday, 23 March 2017

शहिदांचे स्वप्न

                 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहीद दिवस साजरा झाला. कुणी प्रतिमा पूजन केलं तर कुणी प्रोफाईल्स अपडेट केले. याचदिवशी 86 वर्षांपूर्वी ही माती तिच्या तीन पुत्रांच्या हौतात्म्याने पेटून उठले होती. त्या आगीची झळ तिच्यावर राज्य गाजवू पाहणाऱ्या परकीयांना पोहचत होतीच पण ती स्वतः वेदना सोसत होती, वेदनामुक्त होण्यासाठी.. आणि या मुक्तीच्या महायज्ञात स्वतःच्या प्राणाची आहुती देताना त्या तीन युवकांच्या मनाची स्थिती काय असेल? काय साध्य होणार होतं त्या शरीराचा त्याग करून? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आदींनी याचा विचार केलाच असेल ना? ते तिघेच कशाला, स्वातंत्र्यसंग्रामात देशप्रेमाने भारून गेलेल्या प्रत्येकाचे प्राणार्पण हे त्यांच्या ध्येयाच्या मार्गावरील एक पाऊल होते. ही माणसे झेंडे आणि नकाशांच्या पलीकडे जाऊन मानवी जीवनाच्या उत्कर्षाकडे अग्रेसर झालेली असतात. मानवजातीचे उत्थान घडवायचे असेल तर स्वातंत्र्य अनिवार्य आहे. आणि भारतीयांचे वैचारिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य परकीयांच्या महत्वाकांक्षेखाली दबत चालले असताना फक्त पाहत राहणे या 'वेड्या' माणसांकडून शक्य होत नाही. मग पराधीनतेच्या साम्राज्याला सुरुंग लावणारी स्फोटके जन्म घेतात.. कधी शब्दरुपी तर कधी शस्त्ररुपी.. शब्द आणि शस्त्र यांच्या मीलनातून जे जन्म घेते ते क्रांतिकार्य. फक्त शत्रूला नामोहरम करणे हाच क्रांतिकार्याचा उद्देश नसून त्याहीपलीकडे जाऊन प्रत्येकाला स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देणे, स्वतःच्या गुलामीची जाणीव करून देणे हा असतो, जेणेकरून पारतंत्र्याच्या ओझ्याखाली दबुन गेलेला समाजमनाचा आवाज गुलामीविरुद्धचा आक्रोश बनून उसळणार असतो. मग परिवर्तनाचे नवे पर्व सुरु होते. इथे ना भय असते ना द्वेष ना अज्ञान.. अशा आदर्श राष्ट्राची उभारणी हेच भगतसिंग आदी क्रांतिकारकांचे स्वप्न होते. स्वतंत्र भारताचे सार्वभौमत्व आम्हाला अधिकाराने मिळाले सुद्धा पण या अधिकारासोबत येणारे आद्यकर्तव्य म्हणजे त्या स्वप्नाचे पाईक होणे.
         आमच्या पावलाखालच्या स्वतंत्र मातीत कित्येकांचे रक्त मिसळले आहे, या हवेत कित्येकांचे अखेरचे श्वास आणि इन्कलाब जिंदाबाद सारखे शब्द गुंजत असतात.. आम्हाला याची जाणीव आहे? आम्हाला जाणीव होते प्रांतीय राजकारण करताना, जातीय आणि धार्मिक भांडणे करताना. अशा वेळी आमच्या जाणीवा संवेदनशीलतेच्या सगळ्या मर्यादा पार करतात. हा नतद्रष्टपणाच नव्हे का? खरं तर देशप्रेमाने आंधळे झालेले लाखो आहेत. ते देशप्रेम आभासीच म्हणावे लागेल कारण खऱ्या प्रेमाइतके डोळस दुसरे काहीच नसते. हीच आंधळ्यांची फौज राष्ट्राची मूळची संकल्पना डावलून समाजाला 'प्रकाशमयी भविष्याची' स्वप्ने दाखवते. ज्यांना राष्ट्र समजलेच नाही ते राष्ट्र घडवणार कसे? देश हा चार-पाच लोकांच्या विचारसरणीवर चालत नाही. राष्ट्राची स्वतःची एक वैचारिकता असते आणि सद्सद्विवेक हाच तिचा पाया असतो. ही विवेकबुद्धी जपणे, आणि अधिक मजबूत करणे हेच या महान स्वप्नाच्या मार्गातील मोठे आव्हान आहे.

Thursday, 26 January 2017

        आजच्या या  प्रजासत्ताक  दिनाच्या निमित्ताने भारत राष्ट्राच्या ध्वजाला मानवंदना देत, देशभक्तीपर गीतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय प्रजासत्ताकाच्या उन्नतीसाठी व शाश्वततेसाठी कामना करत देशासाठी झिजलेल्या अथवा प्राणार्पण केलेल्या त्या अनेक देहांप्रति आपण आदर व्यक्त करत असतो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो अशी मंगलकामना प्रत्येक भारतीयाच्या मनात उत्सुफुर्तपणे निर्माण होते. प्रजासत्ताक दिन चिरायू व्हावा म्हणजे नेमकं काय शाश्वत असणं आम्हाला अपेक्षित आहे? भारतीय भूमी आणि ध्वज? ही भूमी तर आपली जननी आहे, अनादी अनंतच आहे. भूमी वर आधिपत्य गाजवणाऱ्या शासकांसोबतच ध्वजाचे रंग आणि भारत भूमीचा आकार बदलत राहिला. भाषा आणि संस्कृतीनुसार हे भारतवर्ष अनेक राष्ट्रांमध्ये विभागलं गेलं. मात्र ही अनिश्चिततापूर्ण यादवी संपवावीच लागणार होती. राष्ट्राची संकल्पना उमगलेलया जिवंत मनांनी परकीय शक्तींचं उच्चाटन आणि अखंड राष्ट्रचं निर्माण हे उद्देश स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व या बिरुदाखाली एकत्र आणले आणि एका प्रखर संघर्षानंतर भारतीय गणराज्याचा सूर्य जगाच्या क्षितिजावर पुन्हा तळपू लागला. एका ध्वजाखाली एक राष्ट्र एकसंधपणे उभं राहिलं. या भूमीला एक स्थिर नकाशा मिळाला. पण कोणाच्या तरी इच्छेनुसार आणि कोणाच्या तरी इच्छेविरुद्ध ही भूमी पुन्हा विभागली गेली. मग मात्र नकाशा आणि ध्वज आमची अस्मिता बनले. त्या अस्मितेचं रक्षण करण्यासाठी पुन्हा रक्त सांडलं गेलं, आजही सांडत आहोत. भूमीच्या सार्वभौमत्वावर होणारा प्रत्येक प्रहार स्वतःवर घेत लाखो जवान सीमेवर लढताहेत. त्यांच्या सामर्थ्य आणि देशभक्तीच्या जोरावर कदाचित आपण आपली भूमी अबाधित राखू सुद्धा पण आज ६८ वर्षानंतर सुद्धा या प्रजासत्ताकाच्या चिरायु असण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. कारण भारतीय भूमी शाश्वत आहे पण भारताच्या आणि भारतीयाच्या भारतीयत्वाच्या शाश्वततेचं काय? आमच्याच नकळत आमचा तिरंगा वेगवेगळ्या रंगात विभागाला जातोय कुठल्या तरी जातीचं आणि धर्माचं प्रतीक बनून. तेच रंग प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली त्या त्या रंगाची वादळं  उभी करताहेत, जी वादळं आमच्याच स्थैर्याला आणि एकात्मतेला धक्के देत आहेत. ही प्रादेशिक अस्मिता राष्ट्रभावनेला वरचढ ठरू लागली तर? पुन्हा तेच विभाजन, तोच संघर्ष, तोच रक्तपात. इतिहासाची पुनरावृत्ती घडवून आणून चुका दुरुस्त करण्याची आस बाळगणाऱ्या 'बुद्धिमान' मेंदूंना इतिहासानं मोजलेली किंमत चुकवणं शक्य होणार आहे का? कोणत्या एका जाती-धर्माचे , प्रांताचे असण्यापेक्षा आमचं भारतीय असणं आम्हाला जास्त व्यापक बनवू शकतं. इतिहासात घडलेल्या घटनांना वर्तमानातल्या दुःस्थितीसाठी दोष देत बसण्यापेक्षा इतिहासानं दिलेल्या अमूल्य तत्वांना अंगीकारून एक सच्चा भारतीय बनण्याचा आणि अंतर्गत संघर्षांना पराभूत करून हे राष्ट्र एक प्रजासत्ताक म्हणून खऱ्या अर्थाने चिरायू बनवण्यासाठी प्रयत्न करणं श्रेयस्कर ठरेल.


                                       Ashish Prakash Jadhav